नाशिक - अचानक पुढ्यात बिबट्या आला तर, भल्याभल्यांची बोबडी वळते. पण एका १२ वर्षांच्या मुलाने मोठ्या धीराने बिबट्याने केलेला हल्ला परतावून लावला. त्याच्या या धाडसाचे कौतुक सद्या सर्वत्र होत आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनेरी गावात काळुंगे कुटुंबीय राहतात. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने घरातील मुले देखील शेताच्या कामात घरच्यांना मदत करतात. अशात 3 ऑक्टोबरच्या दुपारी 12 वर्षीय गौरव काळुंगे हा कुटुंबासमवेत शेतात मका सोंगणीचे काम करत होता. अशात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गौरववर हल्ला करत त्याचा उजवा हाथ जबड्यात पकडला. क्षणभर काय झाले हे देखील गौरवला कळले नाही. मात्र घाबरून न जाता त्याने डाव्या हाताने प्रतिकार करत बिबट्याच्या कानशिलात लगावली आणि भांबावलेल्या बिबट्याने गौरवचा हात सोडून मक्याच्या शेतात धूम ठोकली. या घटनेत गौरवच्या हाताला पाच टाके पडले असून त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात आहेत 200 हून अधिक बिबटे -
वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यातील दारणा, गोदावरी, कदवा या नदी परिसरात दोनशेहून अधिक बिबटे आहेत. मुबलक पाणी, सहज मिळणारे भक्ष्य आणि प्रमुख म्हणजे लपण्यासाठी ऊस आणि मक्याचे शेत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात लोकवस्ती भागात ठिकाणी दहा पिंजरे लावण्यात आल्याचे वन विभागाने सांगितले.