नाशिक - देवळा तालुक्यात मालेगाव–कळवण रस्त्यावर (धोबी घाटाजवळ) एसटी बस आणि रिक्षात अपघात झाला होता. यात एसटीतील प्रवाशांना राज्य परिवहन मंडळामार्फत प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. सदर रक्कम धनादेशाद्वारे मृत व्यक्तीच्या वारसांना अदा करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल परिवहन मंडळाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
गेल्या महिन्यात २८ जानेवारीला दुपारी ३.३० वाजेदरम्यान राज्य परिवहन महामंडळाची धुळे-कळवण बस (क्र. एमएच 06 एस 8428) आणि अॅपे रिक्षा यांच्यात अपघात झाला. यानंतर ही दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत पडली होती. या भीषण अपघातात बसमधील 17 प्रवासी आणि रिक्षामधील 9 असे एकूण 26 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच बसमधील नऊ प्रवासी गंभीर आणि २४ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. मृतांमध्ये बसमधील 12 जणांचा समावेश आहे. बसमधील मृतांना राज्य परिवहन मंडळामार्फत प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. तर उर्वरित 5 मृतांच्या वारसांना काही तांत्रिक अडचणी दूर करून रक्कम अदा करण्यात करण्याची कार्यवाही सुरू आहे.
हेही वाचा - नाशिक एसटी-रिक्षा अपघात...वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत व्यक्तींना प्रत्येकी २ लाख रुपये मदत देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली आहे. लवकरच हा महाराष्ट्र शासनास प्राप्त होईल आणि मयतांच्या वारसांना धनादेश वितरीत करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासोबतच गंभीर जखमी स्वरूपाच्या रूग्णांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून ५० हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर रिक्षामधील 9 मयत व्यक्तींना मदत देण्याकामी पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येकी रूपये 2 लाख महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरी करता देण्यात आला आहे. लवकरच यावर कार्यवाही होवून मृताच्या वारसांना मदत देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.