नंदुरबार - शहादा तालुक्यातील म्हसावद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीला लागूनच नवीन इमारत आहे. शाळेतील विद्यार्थी याच इमारतीत खेळण्यासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - नंदुरबार : शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजवल्याप्रकरणी सहा मंडळांवर गुन्हे दाखल
म्हसावद येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून शाळेची इमारत आहे. ही इमारत सागवानी लाकडापासून बनविण्यात आली आहे. मात्र, नंदुरबार जिल्हा परिषद इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. या इमारतीतील सागवानी लाकडांचीही चोरी होत आहे. त्यामुळे इमारत खिळखिळी झाली आहे. तर दुसरीकडे धोकेदायक स्थितीत असलेल्या इमारतीत अनेक गैरप्रकार सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.
हेही वाचा - कोकणीपाड्यात दुकानाला अचानक लागली भीषण आग, पाच लाखांचे नुकसान
जिल्हा प्रशासनाने या इमारतीची दुरुस्ती करावी किंवा तिला जमीनदोस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. या इमारतीच्या दुरवस्थेला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. या इमारतीत घाणीचे साम्राज्य झाले असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरत असल्याने बाजूला असलेल्या नवीन इमारतीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.