नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली जाते. मात्र या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पपई पिकावर आलेल्या रोगामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने पपईच्या बागा जगवल्या. पण मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अशात पपई पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे शेतकरी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे मूग आणि उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर आता पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर महागडी औषधांची फवारणी करुन देखील पपईचे झाड पिवळे पडत आहे. तसेच पपईच्या फळाची वाढ देखील खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी पपईच्या बागाच नष्ट करत आहे.
या वर्षी पपई उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुंतवलेले भांडवलही निघाले नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शासनाने पपई उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी पपई उत्पादक शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
दरम्यान, दुसरीकडे पपईच्या बागांमधील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यावी, त्यासोबत तज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - नंदूरबारमध्ये मुसळधार पावसामुळे घरांची पडझड; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
हेही वाचा - पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही; रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर