नंदुरबार - घराची झाडाझडती घेवुन नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील एका घरातून अडीच लाख रुपये किंमतीचे विविध घरगुती लाकुड साहित्य बनविणार्या साहित्यांसह साग, सिसम जातीचे लाकुड जप्त केल्याची कारवाई नंदुरबार, नवापूर व चिंचपाडा विभागाने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनविभागाच्या हद्दीत नवापाडा येथे एका घरात अवैधरित्या ताज्या तोडीच्या लाकडांपासून घरातील विविध साहित्य बनविण्यासाठी लाकुडसाठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. यावरुन पथकाने नवापाडा येथील घरात छापा टाकुन झाडाझडती घेतली असता अवैध ताज्या तोडीचे साग साईज, सिसम साईज, पायउतराईलसह सिसम लाकडापासून तयार केलेला सोफीसेट, तिपाही, रंधा मशीन, पायउतराई मशिन, असा एकुण 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
लाकुड व त्यापासून केलेले घरगुती साहित्य व मशीन जप्त करुन पथकाने नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केले आहे. याबाबत वनपाल कामोद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयिताविरुध्द भारतीय वनअधिनियम 1927, महाराष्ट्र वननियमावली 2014 व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचा तपास नंदुरबार उपवनसंरक्षक व वनविभाग शहादा, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ही कारवाई नंदुरबार वनविभाग शहादा सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल आर.बी.पवार, वनपाल पी.बी.मावची, आर.बी.जगताप, एम.जे.मंडलिक, पी.एस.पाटील यांच्यासह नंदुरबार, नवापूर व चिंचपाडा वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली.
नवापाडा येथील घरात अवैधरित्या ताजा तोडीच्या लाकडांपासून घरगुती साहित्य बनविण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे भारतीय वनअधिनियम 1927 कलम 72 (सी) अन्वये समन्स काढुन पथकाने घराची झाडाझडती घेतली. या कारवाईत शिसम, साग या वृक्षतोडीचे लाकूड आढळून आल्याने कारवाई केली आहे. यापुढेही अवैध लाकुड तस्करीवर कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा - लाॅकडाऊन: कृषी उत्पन्न बाजार समिती बंद.... शेतकऱ्यांचे मोठे नुकसान