नंदुरबार - जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात आहे. गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने स्वयंप्रेरीत कर्फ्यू लावून घेतला आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावावर ग्रामसुरक्षा दल नेमण्यात आले आहे. हे पथक बाहेरून येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात काल एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्हा अधिक सतर्क झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी अधिक कठोर केली आहे. तसेच अक्कलकुवा तालुका हा गुजरात राज्यालगत असून सिमेवरील डेडियापाडा तालुक्यात तसेच सेलांबा येथे सुध्दा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जनता कर्फ्यू सारखा निर्णय अक्कलकुवामध्ये घेण्यात आलाय.
खापर ग्रामपंचायतने सतर्कता दाखवत अक्कलकुवा शहर दोन दिवस तर खापर शहर तीन दिवस अत्यावश्यक दवाखाना व मेडिकल सेवा वगळता सर्वच दुकाने व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला संपूर्ण ग्रामस्थांनी व व्याप-यांनी पूर्ण पणे प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. अक्कलकुवा व खापर शहर संपूर्ण पणे बंद होते. ठिक ठिकाणी पोलिस विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक वार्डात ग्राम सुरक्षकांना तैनात करण्यात आले आहे. अनोळखी व बाहेर गावातुन आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.