नंदुरबार - विहिरीत पडलेल्या वयोवृध्दाचा मृतदेह काढण्यासाठी विहिरीत उडी मारल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा डॉक्टरांअभावी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे, असा आरोप करीत संतप्त जमावाने खांडबारा ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड केली. तसेच रुग्णालयातील कर्मचार्यांना मारहाणही करण्यात आल्याचा प्रकार खांडबारामध्ये घडला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विसरवाडी पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. शरद सोज्या नाईक असे उपचाअभावी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नवापूर तालुक्यातील भादवड गावातील अर्जुनसिंगा यांच्या झरीपाडा शिवारातील शेतात वयोवृध्द विजयसिंग रेवजी वळवी यांच्या पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच विजयसिंग वळवी यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी शरद सोज्या नाईक (वय 45 रा.भादवड) याने विहीरीत उडी मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने बेशुध्द झाला. गंभीर जखमी झालेल्या शरद नाईक यास उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. परंतु खांडबारा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचाराअभावी शरद नाईक याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यात टेबल, खुर्च्या, औषधी बॉटल्स फोडण्यात आली. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया कक्षातही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटीलसह पोलीस पथक खांडबारा येथे दाखल होते. त्यांनी जमावाला पांगविले. ग्रामीण रुग्णालयात तोडफोडीची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी खांडबारा ग्रामीण रूग्णालय प्रशासन, ग्रामस्थांनी व मयत शरद नाईक यांच्या नातेवाईकांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले. 108 रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने तसेच खांडबारा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचाराअभावी शरद नाईकचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.
दुसरीकडे खांडबारा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात डॉक्टरसह सर्व स्टाफ उपस्थित होता. परंतु रुग्णाचा रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाला होता. शरद नाईक याचे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितल्यानंतर संतप्त जमावाने ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या घटनेक रुग्णवाहिका चालक यांना मारहाण केल्याचे वृत्त आहे. याआधीही खांडबारा ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती. नवापूर तालुक्याही शेही येथील मुलीला सर्पदंश झाल्यानंतर तिला वेळेवर उपचार न मिळाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार यापूर्वी घडला होता.