नंदुरबार - कोरोना लसीकरणात वाढ व्हावी, यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. शहादा-तळोदा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण केल्यास त्यांना प्रत्येकी दोन किलो तांदुळ व दोन किलो साखर दिली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे मजुरांचा रोजगार गेला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक मदत ठरणार आहे. यावेळी नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आता लोकप्रतिनिधी देखील सरसावले आहेत. या उपक्रमांना शहरी भागासह दुर्गम भागात देखील लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे.
95 वर्षीय वृद्धेच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ -
शहादा तालुक्यातील नांदे व तळोदा तालुक्यातील मालदा येथे कोरोना लसीकरणाला आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या कार्यक्रमात व्यस्तीबाई गोरख ठाकरे या 95 वर्षीय वृध्द महिलेला कोरोना प्रतिबंधकाची पहिली लस देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी 45 वर्षांवरील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.
एकही व्यक्ती लसीकरणाविना राहणार नाही- राजेश पाडवी
लसीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राजेश पाडवी म्हणाले की, मतदारसंघात कोणतीही व्यक्ती लस घेतल्याशिवाय राहणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. तसेच 18 वर्षांवरील व 44 वर्षापुढील व्यक्तींच्या ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी उपक्रम -
तालुक्यात काही खासगी संस्थांच्या वतीने लसीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार, अदिवासी समाजात कोरोना लसीबाबत चुकीचा गैरसमज पसरवण्यात आला आहे. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून 45 वर्षांवरील ग्रामीण भागातील कोराना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना 2 किलो तांदूळ, 2 किलो साखर देण्यात येत आहे. लाॅकडाऊन असल्याने मजुर वर्गाच्या हाताला काम नाही, त्यामुळे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 100 टक्के लसीकरण करून घेण्याचा आमचा मानस आहे, असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.
18 वर्षा वरील व 44 वर्षे वरील नागरिकांना देखील आव्हान
18 वर्षा वरील व 44 वर्षापर्यंतच्या तरुण मित्रांनीही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लसिकरण करुन घ्यावी. या साठी मतदारसंघातील सर्वच शासकीय यंत्रणेला व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. जि.प.शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व आरोग्य विभागाचे कर्मचारी व कार्यकर्ते असतील जीव धोक्यात टाकून काम करीत आहेत. म्हणून मतदारसंघातील सर्व जनतेने जास्तीतजास्त लसीकरण करुन घ्यावे अशी विनंती आणि आवाहन करण्यात आले.
अधिकाऱ्यांची उपस्थिती -
लसीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मणिलाल शेल्टे, तालुका शिक्षण अधिकारी पेंढारकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, दिनेश खंडेलवाल, नांदेचे सरपंच काशीराम मोरे, मालदाचे सरपंच गोपी पावरा, रामपुरचे सरपंच नर्मदा पावरा, कुसुमवाडाचे सरपंच दिलीप पवार, स्वीय सहायक विरसिंग पाडवी, भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हा सचिव नारायण ठाकरे, प्रविण वळवी, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, दिपक ठाकरे, दिनेश कोराणे, ग्रा.पं.सदस्य काशीराम मोरे, मनोज बागुल, अविनाश सामुद्रे, ग्रामसेवक किशोर वळवी, सोनु वळवी, हेमराज पवार, विक्की ठाकरे उपस्थित होते.