नंदुरबार - शहादा तालुक्यामध्ये दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्रशासनाला कोरोना नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही शहादा येथील आहेत. दरम्यान, हिंगणे (ता. शहादा) येथील एका 51 वर्षीय रुग्णाचे निधन झाले आहे. त्यामुळे हिंगणे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, डॉक्टरांना आजाराची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांचा दुसर्यांदा घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याच 26 मे रोजी त्या रुग्णाचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ते कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे हिंगणे येथे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
दुसरा कोरोनाबाधित हा शहादा शहरातील गरिब नवाज कॉलनी परिसरातील आहेत. हा भाग यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्र होता. त्या भागातील एका 61 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. या भागात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. प्राप्त अहवालात 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापावेतो 32 जणांना कोरोनाची बाधा झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना आजारापासून 19 जण बरे झाले असून, आता 10 जण उपचार घेत आहेत. कोरोनाला थांबविण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, वारंवार हात साफ करावेत, तोंडाला मास्क लावावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.