नंदुरबार - देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना, आदिवासी संस्कृतीत मात्र महिलांप्रती आदर व्यक्त करण्याची अनोखी परंपरा पाहायला मिळते. आदिवासी बांधव स्त्री वेष परिधान करून पाच दिवस होळी उत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे महिलांचा वेष परिधान करून फिरताना या पुरुष मंडळींना लाज वाटत नाही तर ही मंडळी गर्वाने हे वेष परिधान करून संपूर्ण सातपुडा पालथा घालतात.
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळी उत्सवाची धूम आहे. पारंपरिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण आदिवासी समाज थिरकतो आहे. आपल्या संस्कृतीशी नातं घट्ट करणारा हा उत्सव आबालवृद्धांसाठी नवी ऊर्जा देणारा ठरतोय. याच होळी उत्सवात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अचंबित करणारी दृश्ये होळी उत्सवाच्या नृत्यादरम्यान दिसत आहेत. शेकडो पुरुष मंडळी स्त्री वेष परिधान करून, साजोशृंगार करून ढोल, बासरीच्या सुमधूर आवाजावर थिरकत आहेत. कोणी महिलेच्या तर कोणी मुलीचा वेष परिधान करून आलेला, कोणी तरुण मुलींचा शृंगार करून तर कोणी वृद्ध महिलेच्या वेषात होळी नृत्यात सहभागी झालेले पुरुष महिलांप्रति सन्मान व्यक्त करतात. मजेची गोष्ट म्हणजे हे सर्व आदिवासी बांधव पाच दिवस याच महिला वेषात वावरतात. एक आठवड्याच्या या होळी उत्सवात पुरुष मंडळी स्त्री वेषात वावरतात, रात्री झोपतना देखील हाच वेष असतो.
हेही वाचा - उच्छल तापी नदीत 13 जण असलेली बोट बुडाली; तिघांचा मृत्यू, चार बेपत्ता
आदिवासी संस्कृतीत महिलांना अनन्यसाधारण महत्व आहे, याचेच प्रतीक हा होळी उत्सव आहे. महिलांप्रति सन्मान करण्यात आदिवासी समाज अग्रेसर राहिला आहे. याहा मोगी मातेचा आदर्श ठेवणारा हा समाज महिलांप्रति किती सजग आहे आणि बरोबरीचा दर्जा देतो, हे होळी उत्सवात पदोपदी लक्षात येते. मेकअप करून दाग-दागिने परिधान करून नाचणारे हे पुरुष पाहताक्षणी प्रत्यक्ष महिला किंवा तरुणी वाटतात. निरखून पाहिल्यावर ही नृत्यात बेधुंद झालेली मंडळी महिला नसून पुरुष असल्याचे लक्षात येते. महिलांच्या वेषात मोठ्या रुबाबात वावरणारे हे आदिवासी याच वेषात संपूर्ण सातपुडा पालथा घालतात आणि या दरम्यान ते आपल्या घरी देखील जात नाहीत.
होळीला महिलेचा वेष परिधान करेन, असा नवसही लोक करत असतात. स्वइच्छेने ही पुरुषमंडळी महिलांचा वेष परिधान करतात.
हेही वाचा - नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवींच्या हस्ते होलिकापूजन