नंदुरबार - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर आदिवासी पाड्यांवर साथीच्या आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिवपूर गावात डॉक्टर निलेश पाडवी व डॉक्टर निलेश कुमार वळवी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तंबू टाकून साथीच्या आजारावरील नागरिकांना उपचार सुरू केले आहेत.
मंडपात घेताय उपचार -
नंदुरबार शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील शिवपूर गाव शिवारात रिक्षा, मोटरसायकल, जीप वाहनांनी भरलेले दिसते. गावात प्रवेश करताच एकाच वेळी मंडपाखाली 100 पेक्षा जास्त नागरिक कोणी तंबू खाली तर कोणी गोठ्यात बाहेर ओट्यावर झोपून झाडाच्या फांद्यांना सलाईन लावून उपचार घेत असल्याचे दिसते. आधीच ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची भीती व उपचारासाठी खर्च नसल्याने शिवपूर गावातील निलेश पाडवी यांना नागरिकांनी शहरातून गावात दवाखाना सुरू करण्यास सांगितले. त्यांना साथ मिळाली ती ग्रामीण रुग्णालयातील एमडी मेडिसिन डॉ. निलेश सुकुमार वळवी यांची गेल्या पंधरा दिवसांपासून या मांडवाखाली टायफाईड, खोकला, सर्दी अशा साथीचे आजार असलेले ९०० रुग्ण बरे केले असल्याची माहिती डॉक्टर निलेश पाडवी सांगतात.
आदिवासी डॉक्टरांकडून गावात तंबू उभारून रुग्णांवर उपचार कोविड काळातील आरोग्य सेवा महत्वाची - जिल्हाधिकारी नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीपासून या ठिकाणी मोठे हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेज उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालय व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षभरापासून ३५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागात तर याहूनही परिस्थिती वाईट आहे. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याची खंत जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी व्यक्त केली आहे. शिवपूर गावात डॉ. निलेश कुमार वळवी यांनी सुरू केलेली कोविड काळातील आरोग्य सेवा महत्वाची असून प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे.
900 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार -
आतापर्यंत महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील 15 गावांमधून जवळपास 900 पेक्षा अधिक रूग्ण साथीच्या आजाराने बरे झाले आहे. त्यामुळे आदिवासी डॉक्टरांनी मंडपा खाली सुरू केलेली आरोग्य सेवा लक्षणीय ठरत आहे. नागरिकांनी आरोग्याची सुविधा न पाहता योग्य पद्धतीने उपचार होत असल्याने बरे होऊन रुग्ण घरी जात असल्याने डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
शिवपूर गावाकडे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष -
शिवपूर गावात सुरू केलेल्या आदिवासी डॉक्टरांच्या मेडिकल सेवेला नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची मदत मिळणे गरजेचे आहे. परंतु या जिल्ह्याचे आमदार, खासदार व आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्याकडून अशा सेवेसाठी दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.