नंदुरबार - कोरोना विषाणूची दहशत नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार रेल्वे जंक्शन असून याठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे गाड्या आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून रेल्वेने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
बसस्थानकावरही असेच चित्र असून लांब पल्ल्याच्या बस गाड्या रिकाम्या असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामीण भागात येणाऱ्या शाळा- महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील सिनेमागृहेही बंद ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा - कोरोनावर औषध शोधल्याचा ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा दावा, अमेरिकेतही 'क्लिनिकल ट्रायल' सुरू
जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार देखील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयात विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली असून तालुकास्तरावर देखील अशाच प्रकारच्या विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.