नंदुरबार - पणन महासंघाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यात ऑनलाइन पद्धतीने 380 शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी फक्त 20 शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील हमीभाव केंद्र बंद झाल्याने हजारो क्विंटल ज्वारी शेतकऱ्यांकडे पडून आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अवघ्या 20 शेतकऱ्यांनाच हमीभाव केंद्राचा लाभ मिळाला. हमीभाव केंद्राची खरेदी त्वरित सुरू न केल्यास भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे.
हमीभाव केंद्र सुरू करण्याची - शेतकऱ्यांची मागणी
नंदुरबार जिल्ह्यात ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात ज्वारीची लागवड केली जात असते. रब्बी हंगामातील ज्वारी खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या वतीने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 380 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी अवघ्या 20 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले आहेत. केंद्र सुरू करून बाकी असलेल्या शेतकऱ्यांची ही ज्वारी खरेदी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार- एम्सचा इशारा
भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा -
जिल्ह्यातील 380 शेतकऱ्यांनी नंदुरबार येथील शेतकी संघाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 20 शेतकऱ्यांकडून 850 क्विंटल ज्वारी खरेदी केल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित 360 शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल ज्वारी पडून असून शासनाने लवकरात लवकर हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, सरकारने सुरू केलेले शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारमधील मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.