नंदुरबार - तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी मोबाइलचे दुकान फोडून चोरी केली होती. या गुन्ह्याची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत 2 लाख 89 हजार किंमतीचे 65 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
नंदुरबार शहरातील बस स्थानकासमोरील सत्कार मोबाइल रिपेअरींग दुकानात 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान 16 हजारांच्या रोकडसह रिपेरींगसाठी आलेल्या मोबाइलची चोरी झाली होती. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन स्वतंत्र पथके तयार केली. या पथकाला शहरातील खबरींकडून मिळणार्या माहितीच्या आधारे मागोवा घेण्याच्या सूचना दिल्या. बसस्थानकासमोरील मोबाइल दुकानातील चोरी ही सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट भिलाटी व चिंचपाडा भिलाटी येथील अल्पवयीन 5 ते 6 मुलांनी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने गिरीविहार गेट भिलाटी, जोगनी माता मंदिर, चाररस्ता परिसरातून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला मुद्देमाल एका साथीदाराच्या घरात लपवल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने या घरातून 2 लाख 89 हजारांचे 65 मोबाइल हस्तगत केले आहेत.
काही दिवसांपूर्वी या संशयित युवकांनी शहरातील इंदिरा संकुल येथे डी.डी. बँकेच्या चॅनल गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केल्याची कबूली दिली. हे तिन्ही युवक विधी संघर्ष बालक आहे. तसेच त्यांचे उर्वरित साथीदार पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संंबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस शिपाई आनंदा मराठे, अभय राजपूत, शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संदिप गोसावी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.