नंदुरबार - जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या वरती गेला आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहादा तालुक्यातील सुसरी धरणात पाण्याची पातळी कमी झाली असून सध्या फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे परिसरातील दहा-बारा गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी आणि बोरवेलचीही पाणी पातळी खालावली असून त्याचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्यावर होत आहे. सध्या केळी, पपई, कापूस लागवडीचा हंगाम आहे मात्र, शेतकऱ्यांना पाण्याअभावी अडून पडावे लागत आहे.
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात येत्या काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.