नंदुरबार - शहरातील मध्यवस्तीतील श्री सिद्धिविनायक चौकातील फळ विक्रेत्याच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना दुपारी घडली. तासभर धुमसणाऱ्या आगीत संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. आगीत सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागताच परिसरातील रहिवासी युवकांनी घरात खेळत असलेल्या बालिकेला प्रसंगावधान राखत बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
शहरातील मध्यवर्ती भागात आग
नंदुरबार शहरातील फळविक्रेते चेतनसिंह देवीसिंह राजपूत परिवारासह श्री सिद्धिविनायक चौकात भाडे तत्वाचा घरात राहतात. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजत ते व्यस्त होते. आज मंगळवार आठवडे बाजार असल्याने ते सकाळी लवकर कामधंद्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील बाजारहाट करण्यासाठी बाजार करण्यासाठी गेल्या. घरात पाच वर्षीय बालिका घरात खेळत होती. त्यानंतर अचानक घरातून धूर निघत असल्याचे स्थानिक युवकांच्या लक्षात आले. थोड्या वेळात आगीचे लोळ घराचा बाहेर येत होते. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने पाण्याच्या वर्षाव आगीवर करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नगरपालिकेच्या अग्निशामक बंबला पाचारण करण्यात आले.
नगरपालिका अग्निशामक बंब दाखल
अग्निशामक बंब आल्यानंतर पालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आग सुरू असताना काही युवकांनी धाडस करून संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. तोपर्यंत अनेक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होत्या. आगीत सव्वा दोन लाख रुपये, घरातील पंखे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही,अन्नधान्यसह इतर वस्तू बेचिराख झाल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अग्निशामक बंबाला करावा लागला अडथळ्यांचा सामना
मंगळवार आठवडे बाजार असल्याने मंगळ बाजारात खरेदी विक्री करणाऱ्यांची गर्दी होती. आग लागल्याचे कळताच पालिकेचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. परंतू, बाजारात गर्दी असल्याने अग्निशामक बंबला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळ्यांच्या सामना करावा लागला. घराला अचानक आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने परिवार उघड्यावर आला आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने चेतनसिंह राजपूत व त्यांच्या पत्नीला यांना रडू कोसळले.