नंदुरबार - दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, प्रॅक्टिकल परीक्षा घेणे हे सर्व वेळेत पूर्ण करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, हळहळू काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र शाळा सुरू झाल्यानंतर कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर होते. शाळा सुरू झाल्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
नवीन अभ्यासक्रमामुळे अडचणी
या वर्षापासून इयत्ता बारावीसाठी नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे अभ्यासक्रम शिकवताना शिक्षकांना व समजून घेताना विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सराव परीक्षा होणे गरजेचे
लवकरात लवकर इयत्ता दहावी व बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून सराव परीक्षा घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांची तयारी सुरू आहे. शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तासिका देखील घेत आहेत. विद्यार्थ्यी देखील मोठ्या संख्येने आता शाळेमध्ये येऊ लागले आहेत.