नंदुरबार - कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच हतबल झाले आहेत. त्यावर मात करत वेगवेगळ्या अभिनव प्रयोगाने दैंनदिन जीवनातील कामे सुलभ करण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याच पार्श्वभूमीवर राबवलेल्या 'स्टडी फ्रॉम होम' या संकल्पनेने जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थी अभ्यासात रमले आहेत. या उपक्रमात बौद्धिक ज्ञानार्जनाबरोबर कोरोनाबाबत जनजागृतीही होत आहे.
कोरोनामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली असून परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शाळांना सुट्या असल्या तरी त्याचा सदुपयोग करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नंदुरबारमधील ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना गृह पाठ देत आहे. दुसऱ्या दिवशी हा गृहपाठ तपासण्यासाठीही शिक्षक जातात. यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी बरोबरच शिक्षकांकडून गावामध्ये कोरोना संदर्भात जनजागृती होत आहे.
मास्क कसा साफ करावा, हात कसे स्वच्छ करावेत यांचे मार्गदर्शन हे शिक्षक गावातील अशिक्षित पालकांना करत आहेत. घरच्या घरी मास्क कसे बनावेत याचे प्रशिक्षण गावात दिले जात आहे. एकूणच घरातील पालकांना या संदर्भात प्रशिक्षित केल्यास याचा फायदा होणार असल्याने प्राथमिक शिक्षकांनी सुरू केलेले कार्य प्रेरणादायी आहे.