नंदुरबार : Suspected Ghost Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील ओघानीचा चापडापाडा येथे डाकीण असल्याच्या संशयातून महिलेस जबर मारहाण करण्यात आली. तसेच तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. इतकेच नव्हे तर महिलेला स्मशानभूमीत नेऊन स्मशानमधील राख खाऊ घालण्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डाकीण असल्याच्या संशयातून कुटुंबाला त्रास : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल आहेत. आजही या तालुक्यांतील अनेक गाव, पाड्यांवर जादूटोणा व डाकीण असल्याच्या संशयातून कुटुंबांना त्रास देण्याचा प्रकार सुरुच आहेत. अशीच घटना नुकतीच अक्कलकुवा तालुक्यातील ओघानीचा चापडापाडा येथे घडलीय. ओघाणीचा चापडापाडा येथील एका ५० वर्षीय महिलेवर संशय घेऊन तिनं जादूटोणा करून ओजमा नवसा वसावे यांच्या मुलाला व खेमा नवसा वसावे यांच्या पत्नीला मारल्याचा संशय घेत जमावानं पीडित महिला व तिच्या पतीला गावात त्रास देणं सुरू केलं. इतकंच नाही तर पती-पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात त्यांना तांत्रिक पूजा करायला भाग पाडत स्मशानात नेऊन राख खाऊ घातली.
जादूटोणातून घडलेल्या या प्रकारातून महिलेला व तिच्या कुटुंबियांना मारहाण करत त्रास देण्यात आला. या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्नशील राहू - पी. आर. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल : या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या या महिलेनं व तिच्या पतीनं अखेर मोलगी पोलीस ठाणं गाठलं. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून गुला ओजमा वसावे, ओजमा नवसा वसावे, चंद्रसिंग खेमा वसावे, खेमा नवसा वसावे व ईल्या ओजमा वसावे तसंच बावा ओल्या पाडवी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार 323, 504, 506, 143, 147,149 व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनष्टि व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 नुसार 3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत अधिक तपास करत आहेत.
जादूटोणा व अघोरी प्रथा करत असल्याचा संशय घेऊन अनेक कुटुंबांना त्रास होत असल्याचे दिसून येतंय. तरी शासनानं याबाबत कठोर पाऊलं उचलणं काळाची गरज आहे - सुमित्रा वसावी, अक्कलकुवा तालुका कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मानसिकता बदलण्याची गरज : आजही अनेक गावपाड्यांमध्ये भूत असल्याच्या संशयावरून महिला व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली जाते. आजपर्यंत अशी अनेक प्रकरणं मार्गी लावली आहेत. कायद्यानं जरी त्यांना न्याय मिळाला तरी त्यांना लोकांच्या मानसिकतेतून न्याय मिळालेला नाही. आजपर्यंत आमच्याकडं पोहोचलेली प्रकरणं आम्ही मार्गी लावली. परंतू, असे काही प्रकरणं आहेत की, त्यांना जादूटोणाविषयी कायद्याबद्दल व अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत असलेल्या कामाबद्दल माहिती नाही, त्यामुळं त्यांना कुठं जावं व कोणाला सांगावं हेच माहिती नसल्यामुळं नाहकच आयुष्यभर छळ सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अक्कलकुवा तालुका कार्याध्यक्ष सुमित्रा वसावी यांनी याप्रकरणावर दिली.
हेही वाचा :