नंदुरबार - आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतरांगेत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. येथील हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.
इतर पिकांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीत अधिक आर्थिक लाभ
अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धिरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे. धिरसिंगला शिक्षण घेता आले नसले, तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे आणि त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली.
कृषी विभागामार्फत मार्गदर्शन
डाब येथे 2007पासून स्ट्रॉबेरी लागवड होत आहे. मात्र शेतकरी पारंपरिक पद्धतीने ही लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णत: यश आले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाबळेश्वर येथे शेती सहलीचे आयोजन केले. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला आणि मिळालेल्या संधीचा पूरेपूर उपयोग केला.
दुर्गम भागातील पारंपरिक पिके बाजूला सारत केली स्ट्रॉबेरीची शेती
आपल्याकडील वडिलोपार्जित जमीनीवर नव्या तंत्राने स्ट्रॉबेरीची लागवड केली. पूर्वी वडिलांच्या नावावरील 2 एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या 4 एकर जमीनीवर गहू, हरबरा अशी पारंपरिक पिके घेतली जात असे. त्या जागी धिरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. काही भागात हरबरा आणि भगर लागवडदेखील केली आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्नदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. स्वत: मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासाठी खर्च केला. शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान टाळण्यासाठी किड नियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केला. त्याचा फायदा त्यांना मिळाला.
करार शेतीच्या माध्यमातून वाढविले स्ट्रॉबेरीचे क्षेत्र
धिरसिंग यांनी करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनादेखील स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येत आहे. शेतीतील नवे तंत्र आणि सोबतीला असलेली प्रयोगशिलता यामुळे दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात यश मिळविले आहे. आता त्यांना वेध लागले ते स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवायचे आणि तिचे ब्रँडींग करून मोठ्या शहरापर्यंत पोहोचायचे.
धिरसिंगच्या वार्षिक उत्पन्नात वाढ
गतवर्षी स्ट्रॉबेरी लागवड केल्यामुळे धिरसिंगला 2 लाखाचे उत्पन्न मिळाले, तर यंदा 3 लाखापर्यंत उत्पन्न येईल. असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. सद्यस्थितीत साधारण 80 ते 120 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळतो आहे. चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडींग करून मोठ्या शहरात पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शेतीत नवे तंत्र वापरले त्याचा लाभ निश्चित होतो.
परिसरातील 25 शेतकऱ्यांनी लागवड केली स्ट्रॉबेरी
अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरातील 25 शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. साधारण 10 ते 12 हेक्टरवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. एका एकरवर 30 क्विंटल होणारे उत्पादन 40 क्विंटलपर्यंत व्हावे यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.