नंदुरबार - राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे ऑनलाईन शाळा सुरू असतानाही जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. जिल्ह्यात जवळपास दोन लाख 36 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक लागणार आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नेटवर्क कम्युनिकेशनच्या मोठ्या प्रमाणावर समस्या असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण देणे व घेणे अवघड आहे. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.
दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे
राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला, तर विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरु होतात. त्याप्रमाणे काही शाळा ऑनलाईन सुरु झाल्या. मात्र, नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेला जिल्हा असल्याने येथे इंटरनेटची मोठ्याप्रमाणावर समस्या आहे. गेल्या 2 वर्षापासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र इंटरनेटची सेवा नसल्यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे मोठे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अनेक शिक्षक हे गाव पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांना पुस्तके नसल्यामुळे विद्यार्थी शिकणार कसे असाच प्रश्न आता समोर आला आहे.
राज्यात कोरोनामुक्त गावातील शाळा प्रत्यक्षपणे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानंतर 15 जुलैपासून शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या. मात्र जिल्ह्यात 65 टक्के आदिवासी असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण आधीच कमी आहे. तरीदेखील राज्य शासन या गोष्टीकडे लक्ष कधी देणार हाच एक मोठा प्रश्न समोर आला आहे. कारण ऑनलाईन शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना उलटून गेला तरी देखील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके मिळाले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रशासकीय ढिलाई अडचणीची ठरताना दिसून येत आहे.
राज्यशासनाकडे पुस्तक संचांची मागणी-
शिक्षण विभागाकडून राज्य शासनाकडे सुमारे दोन लाख वीस हजार पेक्षा अधिक पुस्तक संचांची मागणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण दोन लाख 36 हजार पेक्षा अधिक पुस्तक संच यांची मागणी आहे. मात्र गेल्या वर्षातील सुमारे सोळा हजार पुस्तक संच पुनर्र्वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सध्य स्थतिती काही विद्यार्थ्यांना पुस्तक संच उपलब्ध झाले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांनाही पुस्तक वाटपासंदर्भात शिक्षण विभागाकडून वरिष्ठ पातळीवर पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुस्तक संच प्राप्त होतील, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.