नंदुरबार- कोरोना प्रतिबंधासाठी देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याचप्रमाणे, अतिदुर्गम भागातील काही युवक रोजगारासाठी नाशिक येथे कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनादेखील याचा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांनी सायकलीवर तर मजुरांना पायी प्रवास करत आपले घर गाठावे लागत आहे.
जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी राज्यातील अनेक आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शिकण्यासाठी आहेत. यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. धुळे येथील शासकीय वसतिगृहातही अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील ५ विद्यार्थी आश्रयास आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहन नसल्याने विद्यार्थ्यांनी सायकलवरून २०० कि.मी चा प्रवास करत आपले गाव गाठले आहे. राज्यातील अनेक वस्तीगृहांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी अडकलेले असून जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आता पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.
त्याचबरोबर, धडगाव येथील २ युवक आणि २ युवती कंपनीत नोकरी निमित्ताने नाशिकच्या दत्तनगर येथे राहात होते. लॉकडाऊनमुळे या युवक-युवतींनाही राहण्याबाबत गैरसोय झाली आहे. त्यामुळे, काल रात्री चारही युवक-युवती २ वाजता नाशिक येथून पायी चालत धडगावसाठी निघाले होते, ते काल रात्री ९ वाजता शहादा येथे पोहोचले. रात्री धडगाव गाठणे शक्य नाही म्हणून शहादा येथे त्यांनी मुक्काम केला, पण राहण्याची सोय होत नसल्याने त्यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार राजेश पाडवी यांना संपर्क साधून राहण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली. आमदार राजेश पाडवी यांनी आमदार कार्यालयात राहण्याची व्यवस्था करून दिली सोबत युवक-युवतींच्या जेवणाची व्यवस्था देखील करून दिली.
हेही वाचा- जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान