नंदुरबार- नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात भाजीपाल्याच्या दुकानांना आग लागून ४ ते ५ दुकाने जळाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटी केली असता त्यापासून आग लागल्याचे समजले आहे. आगीवर नियंत्रण मिळाले असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
खांडबारा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेली भाजीपाल्याची दुकाने ही नवापूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. येथे रात्री १०.३० च्या सुमारास अचानक दुकानांना आग लागली व तिने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे कळाल्यानंतर खांडबार्यातील अनेक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकांनी मिळेल त्या साहित्याने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजीपाल्यांची दुकाने सलग असल्याने आग पसरतच होती. युवकांनी बादलीद्वारे पाणी मारले. परंतु, आग आटोक्यात येत नव्हती. आग लागलेल्या दुकानांचा संपर्क इतर दुकानांशी तोडल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.
आगीत दुकानांसह ४ ते ५ हातलॉरीही जळाल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी करून बसले असतांना ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मागील कारण वेगळे असल्याचे देखील बोलले जात आहे. दरम्यान, खांडबारा रेल्वे विभागाच्या हद्दीत येणारे अतिक्रमण रेल्वेच्या अधिकार्यांनी १० ते १५ दिवसांपूर्वीच काढले होते. त्यानंतर उर्वरित अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मुदत देण्यात आलेल्या दुकानांना आग लागली होती.
हेही वाचा- नंदुरबार : सारंगखेडा यात्रोत्सवात देशभरातील अश्व व्यापाऱ्यांच्या सहभाग