नंदुरबार - राज्यात एकीकडे लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण होत नाही आहे, असे चित्र असले तरी नंदुरबार जिल्ह्यात सात दिवस पुरेल इतका लसींचा साठा शिल्लक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 45 वर्षाच्या वरील नागरिकांचे 23 टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
15 हाजार लसी जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक -
नंदुरबार जिल्ह्यासाठी राज्य शासनाने तूर्त ३७ हजार ५०० लसी उपलब्ध आहेत. यात २९ हजार ४०० कोविशिल्डचे डोस आहेत तर कोव्हॅक्सिन ८१०० डोसचा समावेश आहे. गुरूवार अखेरपर्यंत यातील २२ हजार ५१२ लसींचा वापर करण्यात आला आहे. १४ हजार ९८८ लसी शिल्लक आहेत. हा साठा जिल्ह्यासाठी सात दिवस पुरेल इतका आहे. जिल्ह्यात १० खासगी हॉस्पिटल आणि ४३ शासकीय रुग्णालय यातून लसीकरण केंद्र सुरु आहेत. नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद -
नंदुरबारमधील ५३ लसीकरण केंद्रावर सुरळीत लसीकरण सुरू असून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांचा रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात लसीकरण सुरळीत चालू असून लसीकरणाचा ग्रामीण भागात वेग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गाव पातळीवर लसीकरण सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील नागरिकांचा लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
जिल्ह्यात 46 लसीकरण केंद्रांची निर्मिती -
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा 16, नवापूर 10, नंदुरबार 12, तळोदा 4, अक्कलकुवा 2, धडगाव 2, अशी एकूण 46 लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात आली आहे. यात सरकारी व खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात शहादा व नंदुरबार येथे खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.