नंदुरबार - उत्तर महाराष्ट्रातील शनी देवस्थान असलेल्या शनिमांडळ येथे दरवर्षी शनी अमावस्येच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिमांडळ गावातील शनिचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज नित्य पूजेनंतर दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनी मंदिराच्या परिसरात फवारणी करण्यात आली असून सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
शनिमांडळ येथे शनी महाराजांचे जागृत देवस्थान असून याठिकाणी दरवर्षी शनी अमावस्येनिमित्त तीन राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. शनी अमावस्येला याठिकाणी मोठी यात्रा भरते. मंदिर परिसरात तालुक्यातील नागरिक व्यवसाय थाटण्यासाठी येतात. मात्र यंदा महामारीमुळे यात्रा होणार नाहीय. यातच जवळच्या रजाळे येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीसाठी मंदिर परिसरात फवारणी करण्यात आली.
शनी मंदिर ट्रस्टच्या वतीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यंदा शनी अमावस्येला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिराच्या पुजाऱ्यांनी नित्य पूजा करून ते बंद केले. आजपर्यंत पहिल्यांदा शनी अमावस्येनिमित्त शनी मंदिर बंद ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सांगितले.