नंदुरबार- नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर या गावातील महिलांनी गावात दारू विक्री आणि दारू पिणाऱ्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देण्यासाठी समशेरपूर गाव परिसरात माहिती देणारे पोस्टर आणि होर्डिंग लावण्यात आले आहेत.
समशेरपूर हे १५०० लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावातील काही तरुण व वयस्कर दारू व्यसनाच्या बळी पडू लागले आहेच. त्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त होऊ लागले होते. गावात मोठ्या प्रमणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे गावातील ४० महिला बचत गटांच्या महिलांनी पुढाकार घेत ग्रामसभेचे आयोजन केले व त्यात दारू पिणारे व दारू विक्री करणाऱ्यांना दंड करण्याचे निर्णय घेतले आहे. मात्र, याबाबतीत त्यांना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी महिलांनी व्यक्त केली आहे.
गावातील महिलांनी गावात दारू विक्री करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला ५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. तर, गावात दारू पिणाऱ्याला १० हजार रुपये दंड तर दारू विक्री करणाऱ्याला २०००० हजार रुपयांचा दंड होणार आहे. सोबतच गाव आणि ३ किलोमीटर परिसरात गावठी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी परिसरात पोस्टर आणि होर्डिंग लावण्यात आले आहेत. गावातील महिला दंड वसूल करणार असून त्या गावात गस्तही घालणार आहेत.
हेही वाचा- आठ लाखांच्या अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त; मोलगी पोलिसांची कारवाई