नंदुरबार - जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील ज्या भागात हे कर्मचारी राहत होते तो भाग प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे. या भागात बाहेरील नागरिकांना जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने याभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त होताच सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. तडवी यांनी बाधित कर्मचार्यांच्या परिसराला भेट दिली. या भागात तत्काळ बॅरिकेटींग करुन सर्व बंद करण्यात आले. बाधित कर्मचार्यांच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. प्रशासनाने भोई गल्लीसह परिसरातील वसाहतींमध्ये फवारणी करुन ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
रुग्णालयात गेलेल्यांचा शोध सुरू -
रजाळे येथील एक कोरोनाबाधित नंदुरबार येथील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. तेथे तो सुमारे दोन तास थांबला होता. याचवेळी नंदुरबार शहरातील व अन्य गावाहून काही रुग्ण तपासणीसाठी आलेले होते. त्यांचाही शोध प्रशासनामार्फत घेतला जात आहे. प्रशासनाला रुग्णालयातून रुग्णांच्या नावांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात नंदुरबार शहरासह खांडबारा, तळोदा, चिंचपाडा, नवागाव, अंतुर्ली या गावातील नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची एकूण संख्या 30 असून यातील 19 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 9 रुग्णांवर उपचार सुरू असून दोघांचा मृत्यू झाला आहे.