नंदुरबार - जिल्ह्यात शहादा शहरातील पंचशील कॉलनीत चोरांनी धुमाकूळ घालून ३ धाडसी घरफोडी केल्या. मात्र, येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे घरफोडणाऱ्यांच्या हाती किरकोळ रक्कम व वस्तूंशिवाय काहीच लागले नाही. याबाबत शहादा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंचशील कॉलनीत धनत्रयोदशीच्या दिवशी रात्रीच्या अडीच वाजेच्या सुमारास ५ ते ८ जणांनी बंद घराची कुलपे तोडून तसेच शेजारील घराच्या कडीकोयंडा लावून मोठी धाडसी चोरी केली. यावेळी आजूबाजूच्या घरमालकांना चोरांचा मागोवा लागल्याने त्यांनी एकमेकांशी मोबाईलने संपर्क साधून चोरट्यांना पळवून लावले. मात्र, चोरट्यांनी सुमारे अर्धा तास येथे धुमाकूळ घातला होता. या घटनेमुळे सर्वत्र परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
या घटनेप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना पाचारण करून घटनेची इत्यंभूत माहिती दिली. पोलिसांनी सदर तिन्ही घरांची तपासणी केली तसेच ठसेतज्ञ व श्वानपथक यांना पाचारण करून घटनेचा मागोवा घेतला. मात्र, तज्ञांच्या पथकाला हाती काहीच लागले नाही.
हेही वाचा - परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादनात घट... शेतकऱ्यांना आर्थिक फटका
सदर, घरफोडी ही केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे यांचे भाडेकरू ग्रामसेवक प्रवीण खाडे हे दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला लागून असलेले पितांबर बैसाणे व सुबोध बैसाणे यांच्या घराचे कडीकोंयडा व कुलपे लावल्याचे दिसल्याने चोरट्यांनी तिथेही घरांवर डल्ला मारला. मात्र, त्यांना हाती काहीच लागले नाही त्यामुळे चोरटे किरकोळ रक्कम घेऊन पसार झाले. याबाबत शहादा पोलिसात पितांबर बैसाने, सुबोध कुमार बैसाणे व नरेंद्र महिरे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा - अक्कलकुवा मतदारसंघातून के. सी. पाडवी सातव्यांदा विजयी