नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिक ताण पडत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आव्हान केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील माजी सैनिक कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मात्र, अचानक सैनिकांना रस्त्यावर पाहताच नागरिक धास्तावून गेले होते. यावेळी त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना अँटि कोरोना फोर्समध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी सैनिकांची एक तुकडी रस्त्यावर उतरली. संपूर्ण आयुष्य ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी समर्पित केले होते, ते आज कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून ते नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक सुरळीत करतानाही माजी सैनिक दिसत होते. माजी सैनिकांना रस्त्यावर पाहून नागरिक मात्र मोठ्या प्रमाणावर धस्तावले होते. यावेळी त्यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहनही केले.