नंदुरबार - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील वाटाघाटीत नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळल्यास राष्ट्रवादीला रामराम ठोकू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित आणि त्यांचे बंधू शरद गावीत यांनी घेतली आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित हे शहादा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद गावीत हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, चारही जागा काँग्रेसला सुटल्याने या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये आचारसंहितेमुळे रखडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे
सोमवारी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची शहादा येथे बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा निर्णय पक्का झाला आहे. जो पक्ष आपल्याला उमेदवारी देईल, त्या पक्षात आपण जाऊ, अशी भूमिका घेतल्याची माहिती राजेंद्रकुमार गावित यांनी दिली. त्यामुळे राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित हे दोघे बंधू राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे आणखी निश्चित झाले नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे.