नंदुरबार - राज्यस्तरीय आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा आज नंदुरबार जिल्ह्यात पाहणी दौरा होता. यावेळी शहरातील पातोंडा अंगणवाडी केंद्रात भेट दिली असता, या अंगणवाडी केंद्रातील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या ठिकाणी एकही मुल SAM म्हणजे तीव्र कुपोषित नसल्याचे सांगण्यात आले व तशी नोंदही रजिस्टरमध्ये आढळून आली आहे.
रजिस्टरमधील नोंदी आणि मुलांची अवस्था बघून आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी एका बालकांची तपासणी केली. त्याचे वजन कमी आढळले आणि ते बालक तीव्र कुपोषित असल्याचे सिद्ध झाले. मात्र रजिस्टरमध्ये त्याची नोंद MAM म्हणजे कमी कुपोषित बालक करण्यात आली होती. त्याला MAM ची ट्रीटमेंट दिली जात होती. तसेच अंगणवाडीतील पटसंख्या व त्यांना दिला जाणारा आहार व इतर आकडेवारी जशीच्या तशी कॉपी-पेस्ट केलेली आढळली. हे पाहुन पंडित यांनी अंगणवाडी सेविकेला चुकीची आकडेवारी लिहिल्याबद्दल चांगलेच धारेवर धरले.
या गैरव्यवहाराबद्दल सीडीपीओ यांना अंगणवाडीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. आढावा समितीच्या नंदुरबार दौऱ्यातील शहरातील पहिल्याच अंगणवाडीच्या पाहणी दौऱ्यात समोर आलेली परिस्थिती बघता ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याबद्दल चिंता व्यक्त केली. या अंगणवाडीला अपूर्ण जागा आणि किचनसाठी जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन अध्यक्षांनी तेथील ग्रामस्थांना अंगणवाडीसाठी किचन बांधून देण्याचे आवाहन केले. व स्वतःकडून किचनसाठी पहिला निधीही दिला. त्यांची ही तळमळ पाहून ग्रामस्थांनी दोन महिन्यात किचन बांधून देण्याचे आश्वासन समिती अध्यक्ष पंडित यांना दिले.