नंदुरबार - उत्तर भारतामधून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. यात मध्यस्थी करून प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पुढाकार घेत पपईचा दर ७ रुपये ११ पैसे प्रति किलो निश्चित केला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचे उत्पादन घेतले जाते. उत्तर भारतात पपईला चांगली मागणी आहे. म्हणून उत्तर भारतातून व्यापारी पपई खरेदीसाठी जिल्ह्यात येत असतात. हे व्यापारी नंदुरबार जिल्ह्यात पपई उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये ते ६ रुपये प्रति किलो दराने दर देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्यात पपई तोडणी बंद केली होती.
उत्तर भारतात टाळेबंदीची शेतकऱ्यांना भीती
उत्तर भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या भागात टाळेबंदी झाली तर व्यापारी पपई खरेदी बंद करतील, अशी पपई उत्पादक शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्यापारी मनमानी करत आरोप जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा-अमेरिकेत ११ डिसेंबरपासून कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता; 'फायझर'चा पुढाकार
गेल्या वर्षीही पपई उत्पादक शेतकरी नुकसानीत
गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पपई व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली होती. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तेव्हादेखील व्यापारी मनमानी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता.
हेही वाचा-लोकशाहीची थट्टा! उपसरपंचपदासाठी चक्क १० लाख ५० हजारांची बोली; व्हिडिओ व्हायरल
पपई उत्पादक शेतकरी दिपक पाटील म्हणाले, की तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी बैठकीला येण्याची तयारी दर्शविली. प्रांताधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर बैठक घेण्यात आली. बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व पपई उत्पादक शेतकरी व प्रांताधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने पुढाकार घेतल्याने पपईच्या दराचा तिढा सुटला आहे.