नंदुरबार - जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. यात ३ पंचायत समितीवर भाजप, दोनवर काँग्रेस, तर एका पंचायत समितीवर सेनेने सत्ता स्थापन केली आहे.
नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे लहान बंधू प्रकाश गावित यांची सभापतीपदी, तर लताबाई पटेल यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. शिवसनेच्या सभापती उपसभापती पदाच्या उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतल्याने भाजपचे सभापती आणि उपसभापती यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे २० पैकी ११ सदस्य होते, तर विरोधकांकडे ९ सदस्यांचे संख्याबळ होते.
शहादा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या बायजाबाई भील, तर उपसभापतीपदी रविंद्र रमाकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या उमेदवारांना २८ पैकी १४ मते मिळाली. विरोधी काँग्रेसला १३ मते, तर भाकपाचा एक सदस्य तटस्थ राहील्याने त्याचा फायदा भाजपला मिळाला.
तळोदा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे यशवंत ठाकरे यांची, तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या लताबाई वळवी यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी ५-५ सदस्य निवडून आल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, मध्यस्थीनंतर काँग्रेस-भाजपने प्रत्येकी अडीच वर्षे सत्ता वाटून घेतली.
अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे मनीषा वसावे, तर विजयसिंग सामा पाडवी यांची उपसभपतीपदी निवड झाली. भाजप ४, काँग्रेस १४ तर, शिवसेना २ असे संख्याबळ होते. मात्र, बहुमत काँग्रेस पक्षाकडे असल्याने सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा - राज्यभर हुडहुडी! निफाड @ 2.4 अंशावर, नंदुरबारमध्येही पारा घसरला
अक्राणी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या हिरा रवींद्र पराडके तर उपाध्यक्षपदी भाईदास कर्मा आत्रे यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसच्या सभापती पदाच्या आणि उपसभापतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने अक्राणी पंचायत समितीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला. अक्राणी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ७, काँग्रेसचे ५ आणि भाजपाचे २ सदस्य असे संख्याबळ आहे.
नवापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रतीलाल कोकणी यांची तर उपसभापती पदासाठी अपक्ष उमेदवार अंशीता उदेसिंग गावित यांची निवड झाली. काँग्रेसच्या उमेदवारांना २० पैकी ११ मते मिळाली तर विरोधी भाजपाला ९ मते मिळाल्याने काँग्रेसचे सभापती यांची निवड घोषीत करण्यात आली. काँग्रेसकडे १०, भाजपाकडे ९ तर, १ अपक्ष उमेदवार निवडणून आले. यावेळी अपक्ष उमेदवारांनी काँग्रेसला मतदान केल्याने काँग्रेसने अपक्ष उमेदवार अंशीता उदेसिंग गावित यांची उपसभापतीपदी वर्णी लावली.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये वातावरणातील बदलामुळे मिरची उत्पादन घटले