नंदुरबार - जिल्ह्यात हवेपासून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे. या ऑक्सिजनचा योग्य वापर व्हावा यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात 'ऑक्सिजन सिस्टर' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले आहे. आता हाच 'ऑक्सिजन सिस्टर'चा प्रयोग राज्यभर राबवण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे.
राज्यभर राबवला जाईल प्रयोग - आरोग्यमंत्री
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड स्वत: वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली. तयार झालेल्या ऑक्सिजनचा योग्य वापर व्हावा यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ ऑक्सिजन लेवल चेक करण्यासाठी नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. वीस रुग्णांसाठी एक याप्रमाणे हा ऑक्सिजन सिस्टरचा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यात सर्वत्र हा प्रयोग राबवणार असल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ऑक्सिजनचा नंदुरबार पॅटर्न -
आरोग्य, शिक्षण यापासून मागासलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आधीपासूनच आरोग्यव्यवस्था कमकुवत आहे. परंतु, कोवीड काळात संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाही जिल्ह्यात हवेपासून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट तयार करण्यात आला. ऑक्सिजनची बचत करून त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी 'ऑक्सिजन सिस्टर' हा प्रयोग राबवण्यात आला. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातीस हा प्रयोग आता राज्यात 'नंदुरबार पॅटर्न' म्हणून ओळखला जात आहे.
हेही वाचा - LIVE UDATE: राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..