नंदुरबार - शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढल्याने उत्पन्नात वाढ झाली. मात्र, आरोग्य धोक्यात आल्याने सेंद्रिय शेती हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ अजय सराफ यांनी केले आहे. ऑस्ट्रेलिया व युरोपच्या धर्तीवर आता सेंद्रिय गट शेती करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच सेंद्रिय शेतीविषयी नंदुरबारच्या शेतकर्यांनी निर्णय घेतल्यास त्यांना कॅनडातील गार्डन व्हिलेज ग्रुप मदत करेल, असे सराफ यांनी सांगितले.
गार्डन व्हिलेज ग्रुपतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लोक सहभागीय प्रकल्प सादरीकरण कार्यक्रम झाला. यावेळी कॅनडा येथील गार्डन व्हिलेज ग्रुपचे प्रमुख गार्थ वॉटसन, विनीत चोपडा, विदर्भातील शेतीतज्ज्ञ सुधीर इंगळे, राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.
हेही वाचा : नंदुरबार जिल्हापरिषद निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 38 टक्के मतदान
आता भारताला विषमुक्त शेतीची गरज असल्याचे मत अजय सराफ यांनी मांडले. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मातेचे पोषण झाले नाही, तर बालक कुपोषित जन्माला येते, असे ते म्हणाले. तसेच शेती एक तंत्र आहे. ती करण्यासाठी आता जमिनीचा पोत सुधारला पाहिजे, अशी गरज सराफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गटशेतीचे महत्त्व समजवले. नियोजनपूर्वक सामूहिक शेती करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
हेही वाचा : शेतकरी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा
सेंद्रिय शेतीवर सराफ यांनी अमरावतीला कार्यशाळा घेतली. त्यानंतर त्यांनी नंदुरबारची निवड केली. पुढे बोलताना, आसाम व तसेच उत्तर पूर्व भागात रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते, असे सराफ यांनी सांगितले. मग महाराष्ट्रासह अन्य राज्यात हा प्रयोग का राबवला जात नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी गार्थ वॉटसन यांनीही इंग्रजीत शेतकर्यांशी संवाद साधला.