नंदुरबार - लॉकडाऊनच्या सुरुवातीला तीन महिने ग्रीन झोनमध्ये असणार्या नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. अवघ्या दीड महिन्यातच कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून दररोज 15 ते 20 रूग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी पुन्हा 12 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
एका दिवसापूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या शहाद्यातील कोरोनाबाधित वृद्ध पुरूषाचा दुसर्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यात बाधितांचा आकडा 334 वर पोहोचला आहे. जून व जुलै या महिन्यातच नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. दिवसेंदिवस येणार्या अहवालांमध्ये नंदुरबार व शहादा शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहेत.
शुक्रवारी एकाच दिवशी पुन्हा कोरोनाचे 12 रूग्ण आढळून आले. यामध्ये नंदुरबारमध्ये 7 तर शहाद्यात 4 रूग्ण आढळले. नंदुरबार शहरातील अंबिका कॉलनीत 36 वर्षीय पुरूष, चौधरी गल्लीत 65 वर्षीय पुरूष, 57 वर्षीय पुरूष, सरोज नगरात 56 वर्षीय पुरूष, परदेशीपुर्यात 58 वर्षीय पुरूष, कुंभारगल्लीत 80 वर्षीय वृध्द महिला व नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथे 25 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत 50 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय पुरूष, खेतिया रोड परिसरात 50 वर्षीय पुरूष तर शहादा तालुक्यातील जयनगरात 23 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांचा परिसर प्रशासनाने कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असून आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे.
शहादा शहरातील कुंभारगल्लीतील 74 वर्षीय वृद्ध पुरुष 16 जुलैला रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र, शुक्रवारी त्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे.