नंदुरबार - शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यासह इतर काही ठिकाणी शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर शहादा तालुक्यातील सोनवल आणि डोंगरगाव येथे घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एक पुरुष व महिला जखमी झाले आहेत. या नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यंदा मान्सूनचे लवकर आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार काल विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले. नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने झाडेदेखील उन्मळून पडली आहेत.
या वादळात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित मदत करण्याचे आदेश पालकमंत्री पाडवी यांनी अधिकाऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. सीमा वळवी, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मागच्या आठवड्यात देखील निसर्ग चक्रीवादळामुळे नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. जोरदार पाऊस आणि वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यावेळी शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या तर आंबा आणि चारोळी या पिकांचेही नुकसान झाले होते. या शेतीचेही पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई देण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.