नंदुरबार - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नंदुरबार जिल्ह्यात 15 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जमावबंदी लागू असल्याने जमावबंदी दुसरा टप्पा आहे. टाळेबंदी असताना विनाकारण शहरात फिरणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आपल्या ताफ्यासह शहरातील काही भागांना भेटी देत विनाकारण फिरताना सापडलेल्यांना समज देत तर काहींना दंड लावून कारवाई केली.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून दिवसागणिक 800 ते 850 बाधित होत आहेत. मृतांची संख्याही वाढली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात 1 एप्रिलपासून संचारबंदी जारी केली आहे. यात सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ नाशवंत वस्तू विक्रीच्या दुकानांना मुभा तर दिवसभर औषध व दवाखाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु, काही जण या नियमावलीला खो देत असल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले. तसेच अनेकजण टाळेबंदी असतानाही विनाकारण शहरात फिरताना दिसून येत आहेत.
पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्वतः शहरातील काही भागांना भेटी दिल्या. रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसलेल्या व्यक्तींची विचारपूस करीत कारण नसताना फिरणार्यांची कानउघाडणी करीत तंबी देवून त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी शहरातील स्टेट बँक परिसर, दिनदयाल चौक, बसस्थानक परिसर, नेहरू पुतळा, मंगळबाजार, गणपती मंदिर, सोनारखुंट, जळका बाजार अशा विविध भागांमध्ये जावून पाहणी करीत टाळेबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले. नंदुरबार जिल्ह्यात 15 दिवसांच्या टाळेबंदीमध्ये प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी जमावबंदी लागू केला असल्याने आज शनिवार दि.3 एप्रिल रोजी जमावबंदीचा दुसरा टप्पा आहे. या जनता कर्फ्युमध्ये औषधालय व रुग्णालय वगळता सर्वच व्यवहार बंद असणार आहेत.
सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूधविक्रीला परवानगी राहील. जिल्हाधिकार्यांनी जनता कर्फ्यूचेही आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. म्हणून व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी करून जनता कर्फ्यूदरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.