नंदुरबार - कोरोनाशी दोन हात करताना आरोग्य यंत्रणेला एकीकडे साहित्याची कमतरता जाणवत आहे. तर, दुसरीकडे रत्यावर असणाऱ्या पोलिसांचा तर साधन साहित्याअभावी जीवच धोक्यात असतो. त्यामुळेच आता पोलिसांनीच यावर जालीम उपाय शोधत कोरोना रुग्णांपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
नंदुरबारमधल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस यंत्रणेसाठी फेस प्रोटेक्शन मास्क तयार केला आहे. चेहरा पूर्णपणे झाकण्यासाठी हे फेस प्रोटेक्शन यूनिट मदतगार ठरणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुख्यालयात जुगाडू पद्धतीने हे फेस प्रोटेक्शन यूनिट तयार केले आहे. जिल्ह्यातील जवळपास पाचशे पोलीसांना हे फेस प्रोटेक्शन यूनिट दिल्या जाणार आहे. विशेष म्हणजे अत्यल्प खर्चात हे सर्व फेस प्रोटेक्शन यूनिट बनविण्यात आले आहेत. तर, जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पाहणी करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नवलेंसह संपूर्ण टिमचे अभिनंदन देखील केले आहे.
कोरोना विषाणूपासून पोलीस दलाचे सरंक्षण जास्तीत जास्त कसे करता येईल, याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांकरीता आपणच फेस मास्क तयार करण्याचे ठरवले गेले. त्यानंतर लागलीच फेस्क मास्कसाठी लागणारे लॅमिनेशन फिल्म, इलेस्टिक पट्टी, फोम शिट इत्यादी वस्तू अल्प दरात उपलब्ध करुन रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सद्यास्थित सीमा तपासणी नाके व फिक्स पॉईंटवरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्येच 500 फेस मास्क तयार केले.
बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फेस मास्कपेक्षा अधिक उत्तम दर्जाचे असे हे मास्क स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तयार केले. त्यांच्या बुध्दी कौशल्याने फक्त 18 रुपयात एक होम मेड फेस मास्क तयार केल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.