नंदुरबार - शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात सुरू असलेल्या बनावट दारू बनविण्याच्या कारखान्यावर नंदुरबार शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विशेष म्हणजे दारूची दुकाने बंद असल्यामुळे मद्यपींची मोठी पंचाईत झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन अनेक महाभाग देशद्रोहाची कृत्ये करताना दिसून येत आहेत. त्यातच नंदुरबार शहरात बनावट दारू बनवण्याचा मोठा कारखाना पोलिसांना आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरातील नव्याने बांधलेल्या वसाहतीत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदवाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला. सुमारे 300 लिटर बनावट दारू साठी लागणारे स्पिरीट, हजारो रिकाम्या बाटल्या, त्यांचे, लेबल याबरोबरच एम. एच. 14 AE 1461 या क्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ यासह पंकज चौधरी व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहराच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट दारू तयार होत असेल, तर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.