नंदूरबार - जिल्ह्यात चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून 86 पैकी 35 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. तर दुसरीकडे नंदूरबार तालुक्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 14 ग्रामपंचायतींवर आपला भगवा फडकवला आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यात शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत एवढे मोठे यश आले आहे. तसेच भाजपाने 21 तर स्थानिक आघाडीने 2 जागांवर विजय मिळवला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची पिछेहाट -
नंदूरबार जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला पीछेहाट सहन करावी लागली आहे. भाजपाने 21 ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. मात्र, गेली 40 वर्ष काँग्रेसची सत्ता असलेल्या कोपर्ली व भालेर ग्रामपंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्व मिळवले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 10 ग्रामपंचायतींवर वर्चस्व -
राष्ट्रवादी काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांच्या नेतृत्त्वाखाली हादा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीने दहा ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. एकूणच महाविकासआघाडीमधील पक्षांच्या ग्रामपंचायतीचा विचार केला असता, जिल्ह्यातील 86 पैकी 63 ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जिंकल्या असल्याचे चित्र आहे.
35 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा -
नंदूरबार जिल्ह्यात 86 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यात 35 ग्रामपंचायत जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात महाआघाडीने 63 जागा जिंकल्या आहेत. त्यात काँग्रेस 35, शिवसेना 18 तर राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या आहेत.
जिल्ह्यातील जनता महाविकास आघाडी सोबत -
जिल्ह्यातील जनता महआघडीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सरकार करत असलेल्या कामांवर जनतेचा विश्वास असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला यश मिळाले, असा दावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी केला आहे.
हेही वाचा - कोथळी ग्रामपंचायतीत खडसे गटाला कौल; विरोधकांच्या पारड्यात 5 जागा