नंदुरबार - जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी तरुणांना अँटी-कोरोना फोर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वयंसेवक होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रांचे प्रमाण वाढले. कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर ते वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला असून आता पोलीस कर्मचार्यांची कमतरता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सुमारे 1600 पोलीस कर्मचारी असून बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर 44 पोलिसांना देखील क्वारंटाईन करावे लागले. काही जण आजारी पडले आहेत.
त्यामुळे केवळ 1300 पोलिसांवर जिल्ह्यातील 20 लाख जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. यापूर्वीच एनसीसी कॅडेटस्, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक अशा जवळपास 650 जणांनी नोंदणी केली आहे. या सर्वांचे कौतुक करून प्रशासनाला स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले.
जिल्ह्यातील 25 ते 45 वयोगटातील तरुणांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.