नंदुरबार - जिल्हा प्रशासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला प्रतिसाद देत शाळाही सुरू झाल्या. मात्र, शिक्षकांचे कोरोना आहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल 102 शाळा व महाविद्यालये अजून बंद असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षण देणाऱ्या एकूण 362 शाळा आहेत. त्यापैकी 260 शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 78 शाळा व 24 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बाधित निघाल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 14,178 आहे. त्यापैकी 7,109 विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याने निम्मे विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्याचे समोर येत आहे.
शिक्षकांची कोरोना चाचणी
शिक्षकांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचे अहवाल उशिरा आल्याने काही शाळा सुरू होऊन बंद कराव्या लागल्या. एकूण जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न अपूर्ण पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण 4141 शिक्षकांची संख्या आहे. त्यापैकी 26 शिक्षक व 4 शिक्षकेतर कर्मचारी बाधित झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण शाळा
नववी ते बारावी - 362
सुरू असलेल्या शाळा - 260
बंद असलेल्या शाळा - 78
बंद असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय - 24
एकूण शिक्षक - 4141
बाधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - 30
एकूण विद्यार्थी संख्या - 14178
हजर असणार्या विद्यार्थ्यांची संख्या - 7109