नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदानकेंद्राच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी ३७४ मतदान केंद्रातील तयारीचा आढावा घेतला. त्यांनी साक्री आणि नंदुरबार या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुम आणि मतदानकेंद्रांना भेट दिली. स्ट्राँगरुममध्ये तात्काळ सीसीटीव्ही व्यवस्था करण्याची संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच साक्री विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रात रॅम्पची सुविधा व्यवस्थित करण्याचे आदेश दिले आहेत. साहित्य देवाण-घेवाण ठिकाणाची पाहणी करून त्याबाबतचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मंजुळे यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थिर सर्वेक्षण पथकास भेट देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. पथकाने आचारसंहिता भंगाबाबतची माहिती तात्काळ निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. नंदुरबार येथील निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण स्थळासही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. निवडणूक यंत्र सेटींग आणि सिलींग करण्याबाबतच्या नियोजनाची त्यांनी माहिती घेतली.