नंदुरबार- खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह किंवा घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यासासाठी नागरिकांकडून मागणी आल्यास त्यास परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी नियम व अटी शर्तीसह मंगल कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मंगल कार्यालयात फक्त 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कुठल्याही कार्यक्रमात योग्य ती खबरदारी घ्यावी, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात यावे, असे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकारी नंदुरबार, शहादा व तळोदा आणि कार्यकारी दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर नवापुर, अक्कलकुवा, अक्राणी यांनी त्यांच्या स्तरावरून ही परवानगी द्यावी. परवानगी दिलेल्या लग्नसमारंभाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.