नंदुरबार - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये दरवाढी या वादातून हमाल मापारी संघाच्यावतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
दर तीन वर्षांनी हमाल मापाडी यांच्या दरवाढीचा निर्णय घेतला जात असतो. मुदत संपल्यानंतरही दरवाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी युनियनतर्फे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरातमधील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी आणलेले धान्य तसेच पडून आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सोमवारपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच व्यापारी व हमाल मापाडी मधला वाद मिटवण्याचा प्रयत्न बाजार समिती करत आहे.
हमाल व व्यापार यांमधील दर वाढ करार संपला -
दर तीन वर्षांनी हमाल मापाडी यांच्या दरासंदर्भात दर तीन वर्षांनी वाढीव दर देऊन करार केला जात असतो. या कराराची मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपली आहे. नवीन दरवाढ एक नोव्हेंबरला मिळणे अपेक्षित असताना अजूनही दरवाढ झाली नाही. याबाबत हमाल मापाडी युनियनतर्फे बाजार समिती व व्यापार यांना याबाबत 31 ऑक्टोबरला सुचित करण्यात आले असल्याची युनियनचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - मेधा पाटकराचं शेतकऱ्यांसह ग्वाल्हेर महामार्गावर आंदोलन; दिल्लीकडे जाताना पोलिसांनी रोखले
शेतमालाच्या नुकसानीची शक्यता -
हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांमधील वादामुळे संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस आला तर शेती मालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हमालांचा व्यापाऱ्यांवर आरोप -
व्यापारी जाणीवपूर्वक दरवाढ करीत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या माल कमी भावात बाजार समितीच्या बाहेर खरेदी करायचा असल्यामुळे त्यांनी हे आंदोलन करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप हमाल मापाडी यांचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केला आहे.