नंदुरबार - आरोग्य सुविधांमध्ये मागासलेला नंदुरबार जिल्हा आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहे. विशेष म्हणजे याच आदिवासी भागातील स्थानिक असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ज्या नंदुरबार जिल्ह्यातून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्याच नंदुरबारला ते आपल्या कल्पकतेतून आरोग्य सुविधासाठी सबळ आणि परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करत आहे. पाहुयात एक विशेष रिपोर्ट..
आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल -
आरोग्य सुविधांची मोठी वानवा असलेला आदिवासी बहुल जिल्हा म्हणुन नंदुरबारची ओळख. मात्र कोरोना काळतील दुसऱ्या लाटेत नंदुरबारच्या आरोग्य सुविधांमध्ये झालेल्या सुधारणात्मक बदलांमुळे नंदुरबारच्या आरोग्य यंत्रणेला राज्य शासनाकडून शाब्बासकीची थापही मिळाली. यासाठी कारागीर ठरली ती जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची दूरदृष्टी. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ते आतापासून सज्ज झाले असून पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेडची सुविधा -
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्यासह ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा प्रत्येक गावपातळीवर विलगीकरण कक्ष उभारण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी सध्या हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या तीन प्रकल्पांसोबत तळोदा आणि नवापूर येथे प्रत्येकी ७५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीचा प्रकल्पाच्या वर्क ऑर्डर देखील देण्यात आल्या आहेत. सोबत जिल्हा शासकीय रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठीचा पाया पुर्णत्वास आला असून येत्या पंधरा दिवसात हा प्रकल्प उभारुन कार्यान्वित करण्याचा मानस देखील जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे सर्व ऑक्सिजन प्रकल्प जर कार्यान्वित झाले तर दिवसाकाठी हजार जंबो सिलेंडर ऑक्सिजन नंदुरबारमध्येच मिळू शकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या गरजेनुसार जिल्हा ऑक्सिजनसाठी स्वयंपुर्ण होईल.
जिल्हा क्रीडा संकुलात जम्बो हॉस्पिटलची निर्मिती -
जिल्ह्यात याच सोबत जिल्हा क्रिडा संकुलाच्या डोममध्ये एक जंबो हॉस्पीटल निर्मीतीचे कामही प्रशासनाने सुरू केले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाच्या वाढीवर भर -
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या समोर खऱ्या अर्थाने नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागातील लसीकरणाचा टक्का वाढवण्याचे आव्हान आहे. आदिवासी बहुल भागात लसीबाबत असलेल्या शंका आणि अफवांमुळे पहिल्या टप्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र कोरोनाच्या लढाईत लस हे प्रभावशाली हत्यार असल्याने सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात ती पोहचवण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पुढाऱ्यांना यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
मुबलक रुग्णवाहिका उपलब्ध -
गेल्या वर्षभरात रुग्णवाहिकांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत होता. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या प्रयत्नाने नंदुरबार जिल्ह्यासाठी मुबलक प्रमाणावर रुग्णवाहिका व शववहिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात व इतरत्र उपचारासाठी ने आण करण्यासाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे.
भूमिपुत्राने केले स्वप्न साकार -
नंदुरबार जिल्ह्याला लागुनच असेलल्या साक्री तालुक्यातल्या सामोडे गावातील आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. राजेंद्र भारुड यांनी आपले प्राथमिक शिक्षण सामोड्यातून घेत पुढचे शिक्षण अक्कलकुवा तालुक्यातील नवोदय विद्यालयातून पुर्ण केले आहे. ज्या आदिवासी बहुल भागात शिकलो त्याला आपले काही देणे आहे. या प्रशासकीय दृष्टीकोणातुन त्यांनी सुरू केलेल्या कामाचे परिणाम दिसून येत आहे. सुरुवातील नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि त्यांनंतर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम केलेले डॉ. राजेंद्र भारुड गेल्या पावणेदोन वर्षांपासुन नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत आहे. आदिवासी युवकांसाठी ते प्रेरणास्थान असून सोशल मीडियावर त्यांच्या कामाला पसंती मिळत आहे.
हेही वाचा - म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार - राजेश टोपे