नंदुरबार - धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप ७० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात ६ मजुरांना जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक मजूर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोरणमाळहून म्हसावदकडे निघालेली खाजगी प्रवासी जीप खोल दरीत कोसळली. या जीपमध्ये पंधरापेक्षा अधिक मजूर प्रवासी प्रवास करीत होते. यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातील मजूर तोरणमाळ येथे कामाला जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. आजूबाजूचे ग्रामस्थही घटनास्थळी मदत करीत आहेत. दरी खोल असल्याने, मजुरांचे प्रेत काढणे अवघड जात आहे. जखमींना मिळेल त्या वाहनाने रूग्णालयात नेण्यात येत आहे.
अपघात इतका भीषण होता की, प्रवाशी जीपचे सर्व भाग दरीत अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या अपघातातील मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील दोन नंबरचे थंड हवामान असलेल्या तोरणमाळ परिसरात मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण होत असते. दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे येथील स्थानिकांना अवैधरित्या खाजगी प्रवासी जीपने प्रवास करावा लागतो.
हेही वाचा - पाण्यातून प्रवास करत बजावला मतदानाचा हक्क
हेही वाचा - उच्चशिक्षित तरुणाने नोकरी सोडून केली शेती.. सहा एकर मिरचीतून 500 क्विंटलचे उत्पन्न