नंदुरबार - शहादा तालुक्यातील भोरटेक, ओझर्टा, चिखली खुर्दे, जाम, वाघर्डे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. शेतशिवारातील झाडे उन्मळून पडली. एका पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून पोल्ट्री फार्म भुईसपाट झाली. त्यात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वाऱ्याच्या जोरामुळे काही भागांत विजेचे खांबे तारा तुटून पडल्या आहेत. ट्रान्सफार्मर पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून ५०० मीटरहून अधिक अंतरावर जाऊन पडले. शेडची पडझड झाली. शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लवकरच पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नुकसानग्रस्त भागांची आमदार राजेश पाडवींकडून अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी -
शहादा तालुक्यातील भोरटेक, ओझर्टा, चिखली खुर्दे, जाम, वाघर्डे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या पावसा दरम्यान अतोनात नुकसान झाले. गावातील नागरिकांनी लागलीच आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सूचना देऊन त्वरित पाहणी करण्यास सांगितले. सायंकाळी उशिरा शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.
लवकर मदतीचे दिले आश्वासन -
शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यावेळी आमदार पाडवी यांनी नुकसानग्रस्तांना धीर देत संवाद साधला. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून माहिती देऊन तत्काळ मदत देण्याची विनंती केली. त्याचसोबत कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनाही पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार पाडवी यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ज्यांचे कोणाचे नुकसान झाले असेल त्यांनी आपल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना कळवून लागलीच पंचनामा करून घ्यावा. विजेचे खांब व विद्यूत पोल पडून तारा तुटल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी अभियंता मिलिंद ठाकूर यांना लवकरच नवीन पोल व तारा बसवून विद्युत प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. कोणाला काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान झाले असेल तर आपणही संबंधित तलाठ्यांना संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आमदार पाडवी यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी आमदार राजेश पाडवी, जि. प. सदस्य सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा योगेश पाटील, गोपाल पावरा मुबारकपूर, सुभाष वाघ सरपंच, दिलवरसिंग पवार सरपंच, प्रवीण वळवी, कल्पेश राजपूत, स्वीय सहाय्यक हेमराज पवार आदी उपस्थित होते.