नंदुरबार - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 19 जून 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत नंदुरबार शहरातील बाजार व इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. डॉ. भारूड हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार शहरातील उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपपोलीस अधीक्षक रमेश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना आणि पेट्रोल पंप सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहतील. शासकीय कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. औषधांची दुकाने आणि दवाखाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. त्यासाठी वरील वेळेचे बंधन असणार नाही. शहरातील नागरिकांना दुपारी 12 नंतर कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाऊ नये. अत्यावश्यक कामांसाठी केवळ दिलेल्या वेळेतच बाहेर पडावे. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करावे. त्यासाठी नगरपालिकेने पथकांची संख्या वाढवावी.
जिल्ह्याच्या सीमेवर कडकपणे तपासणी करण्यात यावी. मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये. आरोग्य विषयक कारणाने आले असल्यास विलगिकरण कक्षात ठेवण्यात यावे. विनापरवाना आलेल्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. चारही दिवस शासकीय कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी वगळता कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी. नागरिकांना त्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात यावी. या क्षेत्रात नगरपालिका, महसूल आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसातून एकदा भेट देऊन पाहणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरातील सर्व रस्त्यावर बॅरेकेडींग करण्यात यावे. केवळ मालवाहतूकीसाठी जिल्ह्याबाहेर जाणारे रस्ते सुरू ठेवण्यात यावे. जिल्ह्यातील इतर शहरातही नगर पालिका प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. नागरिकांनी सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. जिल्ह्याबाहेरून दररोज ये-जा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.